अहिल्यानगर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती पर्वानिमित्त जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम
अहिल्यानगर, दि. 30 – राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती पर्वानिमित्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने २६ जून ते ४ जुलै २०२५ या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या तसेच सीईटी परीक्षा दिलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सहजतेने मिळावे, यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
या मोहिमेअंतर्गत कनिष्ठ महाविद्यालयांतील विज्ञान शाखेतील विद्यार्थी व डिप्लोमा अभ्यासक्रमातील तृतीय वर्षाच्या प्रवेशितांची जात पडताळणी प्रकरणे तालुका व महाविद्यालयनिहाय संख्यात्मक स्वरूपात संकलित केली जाणार आहेत. ही माहिती समान संधी केंद्राच्या माध्यमातून महाविद्यालय स्तरावर गोळा करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज भरून घेण्याचे नियोजन असून अर्जातील त्रुटींची दुरुस्ती व मार्गदर्शनासाठी वेबिनारचे आयोजन करण्यात येणार आहे. या वेबिनारमधून महाविद्यालयातील प्राचार्य व संबंधित प्रशासनास कार्यपद्धती, आवश्यक कागदपत्रे व प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात येईल. त्रुटी दुरुस्ती मोहिम २७ जून ते ३ जुलैदरम्यान : जयंती पर्व कालावधीत २७ जून ते ३ जुलै २०२५ दरम्यान, जात पडताळणी समिती कार्यालयात कार्यालयीन वेळेत त्रुटी दुरुस्ती मोहीम राबविण्यात येणार आहे. विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेले तसेच सीईटी परीक्षा दिलेले विद्यार्थी आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत, असे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
महाविद्यालयांना सूचना व आवाहन : सन २०२५–२६ या शैक्षणिक वर्षात विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांची माहिती १५-A नमुन्यावर शिफारस करून महाविद्यालयांनी सूचना फलकावर मोहिमेसंदर्भातील माहिती प्रसिद्ध करावी. त्यासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करून, समान संधी केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयातच जमा करून घेण्याचे निर्देशही समितीने दिले आहेत. विद्यार्थ्यांनी या विशेष मोहिमेचा लाभ घेऊन आपल्या जात वैधता प्रमाणपत्राची प्रक्रिया वेळेत पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवावे, असे आवाहन जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासन विविध घटकांसाठी अनेक योजना राबवत आहे. शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना व पीएम किसान निधी, महिलांसाठी भाग्यश्री व महिला सक्षमीकरण योजना, विद्यार्थ्यांसाठी शाहू महाराज शिष्यवृत्ती व शैक्षणिक कर्ज योजना, तर आरोग्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना, आणि घरासाठी प्रधानमंत्री आवास योजना अशा उपयुक्त योजना उपलब्ध आहेत. या योजना नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आहेत.