छेड काढणाऱ्या टवाळखोराला तरुणीने भररस्त्यात झोडपले…
औरंगाबाद : मोठ्या बहिणीची छेड काढणाऱ्या टवाळखोराला लहान बहिणीने भररस्त्यात चांगलाच चोप दिला. ही घटना शहरातील सुतगिरणी चौक परिसरात काल दि.२५ रोजी दुपारच्या वेळी घडली. तरुणीचं हे रौद्र रुप बघुन घाबरलेला दुसरा टवाळखोर दुचाकी तिथेच सोडून पळून गेला.
२३ वर्षीय विवाहिता लहान भावासोबत औरंगपुरा परिसरात गेली होती. तेथून भावाचा गारखेडा परिसरात कोचिंग क्लास असल्याने त्याला तिकडे सोडण्यासाठी ती औरंगपुऱ्यातून गारखेड्याकडे निघाली. तेव्हा औरंगपुऱ्यातून दोन टवाळखोरांनी तिचा पाठलाग सुरू केला. हा प्रकार तरुणीच्या लक्षात आला. मात्र थोड्या वेळाने थांबतील म्हणून तिने दुर्लक्ष केले. मात्र, दर्गा रस्त्यापर्यंत त्यांनी पाठलाग सुरू केला. त्यांची हिंमत वाढली होती. त्यांनी अश्लील हातवारे करणे, अश्लील शब्द वापरणे सुरू केले.
दरम्यान, या तरुणीने एका ठिकाणी थांबून आपल्या लहान बहिणीला हा प्रकार कळवला होता. तिने तिला न थांबता पुढे जात राहण्यास सांगितले. तरुणी सूतगिरणी चौकात पोहोचली तरीही ते टवाळखोर थांबले नव्हते. सुतगिरणी चौकात पोहोचताच तिची लहान बहीण तेथे आली. तिने थेट या टवाळखोरांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरु केली. तरुणीचा रुद्रावतार पाहून त्यातल्या एका टवाळखोराने आपली मोटारसायकल सोडून पळ काढला. काही वेळात लोक जमायला लागली आणि हे पाहून दुसरा टवाळखोर देखील तेथून पळून गेला. हा सगळा प्रकार सुरु असताना तिथे बरेच लोक जमा झाले पण कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. मात्र तरुणीच्या धाडसाने या टवाळखोरांना चांगलीच अद्दल घडली.