Nagar Tourism || एक दुर्लक्षित आणि अपरिचित किल्ला मांजरसुंभा || Manjarsumbha Fort
नगर – संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर नगर पासून साधारण १० ते ११ किमी अंतरावर डावीकडे वांबोरी गावाचा फाटा आहे. या फाट्यापासून ९ किमी अंतरावर मांजरसुंभा गावाच्या मागे मांजरसुंभा नावाचा एक छोटेखानी पण देखणा किल्ला आहे. आगडगाव या डोंगर रांगेतील हा छोटासा किल्ला गावातूनच उठवलेला असुन त्यावरील उंच इमारती व प्रवेशद्वाराचे अवशेष आपल्याला दुरवरून नजरेस पडतात. गावापासून पुढे उजवीकडून कच्च्या रस्त्याने १० मिनिटांत आपण गडपायथ्याच्या एका वेगळ्याच बांधणीच्या बुरुजापाशी येऊन पोचतो. या किल्ल्याचा इतिहास उपलब्ध नसुन हा किल्ला निजामशाहीत दौलताबाद आणि अहमदनगर दरम्यान संदेशवहन व टेहळणीचे काम करण्यासाठी आणि विश्रांतीस्थान म्हणून बांधला गेला
>
किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आजही उत्तम स्थितीत असुन वेगळ्याच धाटणीचे आहे. बलाढय अशा या दरवाजाच्या कमानी, घुमट आणि नक्षीदार गवाक्षे पाहण्यासारखी आहेत. दरवाजाच्या वरील भागात जाण्यासाठी जिना असुन तिथुन गडाचा संपुर्ण परीसर व दूरवरचा प्रदेश नजरेत येतो. या बुरुजाच्या माथ्यावर एक लहानसे मारुतीचे मंदिर आहे. गडाच्या या भागात छोटीशी तटबंदी व खंदक असल्याचे जाणवते. इतर ठिकाणी मात्र गडाला नैसर्गिक खंदकाचे आवरण आहे. पायथ्यापासुन गडाची उंची कमी असल्याने फक्त पंधराच मिनिटात आपण गडाच्या मुख्य दरवाज्यापाशी येतो
या वास्तूत एक कबर असुन एक कारंजे आहे. तलावाचे पाणी या कारंज्याकडे वळविले आहे. महालाच्या डावीकडे सदरेची इमारत व अंबरखाना असुन त्याच्या खालच्या बाजुस हमामखाना आहे तर उजवीकडे एक प्रशस्त बांधीव कोरडा तलाव आहे. या तलावाकडे पाठ करून उभं राहिलं की समोर दरी दिसते. गडाची ही बाजू खोल आणि नैसर्गिकरीत्या भक्कम स्वरूपाची आहे. या मुळे गडाला बुरुजाची कातळ भिंत वगळता इतर बाजूंना तटबंदी नाही किंवा काळाच्या ओघात ती नष्ट झाली असावी. या अवशेषांशिवाय गडाला उत्तरेकडे एक चोरदरवाजा व दुसरा दरवाजा असुन एक तीन मजली भव्य बुरुज आहे. या बुरुजाच्या अलीकडे डावीकडे थोडं खाली उतरून गेल्यास तटबंदीचे अवशेष दिसून येतात. पायवाटेने तटबंदीवरून चालत या बुरुजाकडे आल्यावर बुरुजामध्ये उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. या पायऱ्या उतरताच आपण बुरुजाच्या मधल्या भागात येवून पोहोचतो. बुरुजाच्या डावीकडील कमानीतून पाहिल्यास गडाची तटबंदी दिसते तर उजवीकडे कमानीतून खुप लांबवरचा परिसर व गडाचा दुसरा दरवाजा नजरेस पडतो. या बुरुजाखाली अजुन एक मजला असुन त्यात उतरण्यासाठी एक झरोका आहे. या झरोक्यातुन खाली उतरण्यासाठी भिंतीमध्ये साधारण ३-४ फूट अंतरावर दगडी चिरे रोवलेले आहेत. खालील तळमजला टेहळणीसाठी बांधला असुन या झरोक्याशेजारी साधारण २० फूट किल्ल्याच्या बाहेरील बाजूस खाली पाण्याचे खोदीव टाके आहे. हे पाणी तळमजल्याहुन तसेच झरोक्यातून सहजपणे काढता यावे अशी त्याची रचना आहे
गडाच्या मुख्य दरवाजातून आत शिरल्यावर डावीकडे वळलो कि एक तीन मजली भव्य पण भग्न इमारत आहे. स्थानिकांच्या मते हा निजामाच्या काळात बांधलेला राजवाडा आहे तर काहीच्या मते हा शार्दूल बाबाचा महाल आहे, हा महाल त्यांना तत्कालीन राजाने बांधून दिलेला आहे अशी विविध मते या वास्तूविषयी आहेत
बुरुजातून बाहेर पडण्यासाठी उजवीकडे दरवाजा आहे. या दरवाजातून बाहेर पडुन थोडं पुढे जाताच टोकाला काही पायऱ्या आणि तटबंदीचे अवशेष दिसतात. इथे गडाचा मागील दुसरा दरवाजा आहे. या दरवाजातून काही पायऱ्या उतरल्यावर गडाला वळसा मारत गडाखाली जाता येते. खाली उतरताना गडाची ताशीव कातळभिंत डावीकडे ठेवत वळसा मारत सरळ पुढे गेल्यास पाण्याची कातळात खोदलेली ९ टाकी नजरेस पडतात. हि टाकी वापरात नसल्याने यातील पाणी पिण्यायोग्य नाही. यातील चौथे टाके बुरुजाखाली असुन या टाक्याकडून बुरुजाच्या तळमजल्यातील झरोका स्पष्ट दिसतो. बुरुजाच्या खाली थेट टाक्यापर्यंतचा १००-१२५ फुट कातळ तासून काढलेला असुन खालचे टाके दगडी चिऱ्यांनी बांधून काढले आहे. येथे आपली गडफेरी पुर्ण होते. येथुन पुढे खाली उतरायचे किंवा पायऱ्या चढून गडाच्या मागच्या दरवाजात येऊन आलो त्या वाटेने मागे फिरायचे. संपुर्ण किल्ला फिरायला साधारण २.३० तास लागतात. पुन्हा गावाकडे परतताना उजवीकडे दिसणाऱ्या एका डोंगरावर गोरक्षनाथाचे मंदिर आहे त्यास गोरक्षगड असे म्हणतात पण हा गड किंवा किल्ला नसुन केवळ मंदीर आहे. नगर शहरापासुन जवळच असणाऱ्या या अपरिचित किल्ल्याला एकदा तरी भेट द्यायला हवी.
——————-सुरेश निंबाळकर
Post Credit: Nagar Trekkers Youtube Channel
Proud of these acient monument ����