नगरमध्ये ‘दुकाने, मॉल, उपहारगृहे रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार; परंतु ‘या’ अटी पाळाव्याच लागणार!
अहमदनगर जिल्ह्यात अजूनदेखील दैनंदिन कोविड रुग्णसंख्या कमी-अधिक होणे चालू असताना नगर जिल्ह्यात राज्याचा नियम जिल्ह्याला लागू करण्यात आला असून आता नगर जिल्ह्यातील दुकाने, मॉल, उपहारगृहे रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. 15 ऑगस्टपासून हा नवीन आदेश लागू होणार असल्याचे नगर जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नवीन आदेश पुढील प्रमाणे –
दुकाने, शॉपिंग माल:
सर्व दुकाने सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. दुकानात काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या 2 मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर 14 दिवसाचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक राहील. लसीकरण प्रमाणपत्र व त्यासमवेत फोटोसहीत ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक राहील.
खासगी कार्यालये:
खासगी कार्यालयांना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालये 24 तास सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.
उपहारगृह/बार:
▪️ खुली अथवा बंदिस्त उपहारगृहे आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू करण्याची मुभा देण्यात येत आहे.
▪️ उपहारगृह/बारमध्ये काम करणारे आचारी, वाढपे, व्यवस्थापक व स्वच्छता कर्मचाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांचे कोरोनाचे लसीकरण करणे आवश्यक आहे.
▪️सर्वांना मुखपट्टीचा वापर अनिवार्य, सॅनिटायझरची व्यवस्था असणे आवश्यक, शारीरिक अंतराचे पालन आवश्यक आहे.
▪️ ज्या कर्मचाऱ्यांनी लसीकरणाची दुसरी मात्रा घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण केलेत, असेच कर्मचारी व व्यवस्थापक उपहारगृह/बारमध्ये काम करू शकतील
जिम्नॅशिअम, योगसेंटर, सलून, स्पा:
वातानुकुलित तसेच विनावातानुकुलित जिम्नॅशिअम, योगसेंटर, सलून, स्पा 50 टक्के क्षमतेने सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. या संस्था वातानुकूलीत असल्यास, वायुविजनासाठी फॅन व वातानुकूलनासह खिडकी अथवा दरवाजा उघडा ठेवणे आवश्यक राहील.
मैदाने, उद्याने, खेळ:
▪️इनडोअर गेममध्ये खेळाडूना बॅडमिंटन, टेबलटेनिस, स्क्वॅश, पॅरलल बार, मलखांब केवळ अशाच खेळांसाठी केवळ 2 खेळाडू या मर्यादेत सुरू करण्याची मुभा देण्यात येत आहे.
▪️ राज्यातील सर्व मैदाने, उद्याने, चौपाट्या, समुद्रकिनारे स्थानिक प्राधिकरणाने विहित केल्यानुसार त्यांच्या नियमित वेळेत सुरू राहतील.
विवाह सोहळे :
▪️ खुल्या प्रांगण / लॉन मध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यास उपस्थितांची संख्या प्रांगण किंवा लॉन क्षमतेच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 200 व्यक्ती या मर्यादेत असेल.
▪️ बंदिस्त मंगल कार्यालय /हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या हॉटेलमधील आसन व्यवस्थेच्या 50 टक्के/ जास्तीत जास्त 100 व्यक्ती या मर्यादेत असेल.
सिनेमागृहे व मल्टिप्लेक्स, धार्मिक स्थळेः
सिनेमागृह / नाट्यगृह, मल्टिप्लेक्स (स्वतंत्र तसेच शॉपिंग मॉलमधील) पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. सर्व धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत नागरिकांसाठी बंद राहतील.