शिर्डी मध्ये १ ते ६ ऑक्टोबर दरम्यान विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन… आजचा साक्षीदार | SAKSHIDAR:
आजचा साक्षीदार | SAKSHIDAR: राज्य शासनाने मंदिरे उघडण्यासाठी मंजूरी दिल्यानंतर शिर्डी येथील श्री साई मंदिर ७ ऑक्टोबर,२०२१ रोजी उघडण्यात येणार आहे. शिर्डी व आजूबाजूच्या परिसरातील दूकाने, हॉटेल, लॉज व अन्य व्यावसायिक आस्थापना येथे भाविकांची गर्दी होईल या पार्श्वभूमीवर स्थानिक व्यावसायिक आणि त्यांच्या आस्थापनावर कार्यरत कर्मचाऱ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोसचे लसीकरण व्हावे यासाठी राहाता तालुका आरोग्य विभाग व शिर्डी नगर पंचायतीतर्फे १ ते ६ ऑक्टोबर, २०२१ दरम्यान विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोहिमेद्वारे कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून शिर्डी शहर व परिसरातील १८ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे. लसीकरण मोहिमेचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
दिनांक १ ऑक्टोबर,२०२१ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंपळवाडी रोड, शिर्डी, दिनांक २ ऑक्टोबर रोजी श्री साईनाथ हायस्कुल, नांदुर्खी रोड, दिनांक ३ ऑक्टोबर रोजी आदर्श माध्यमिक शाळा, दिनांक ४ ऑक्टोबर रोजी ऊर्दू हायस्कूल, कनकुरी रोड, दिनांक ५ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद शाळा, बिरेगाव बन, आणि दिनांक ६ ऑक्टोबर रोजी काशि अन्नपूर्ण सत्रम, लोढा ओपन स्पेस, पानमळा रोड, येथे लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. शिर्डी नगर पंचायतीतर्फे चेावीस तास कोरोना नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून नागरिकांनी १८००२३३५१५० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. आवाहन
शिर्डी शहरातील लसीचे दोन्ही डोस न घेतलेल्या व्यावसायिकांनी अथवा त्यांच्या आस्थापनेवर कार्यरत कर्मचाऱ्यांना व्यवसाय करण्यास प्रतिबंध करण्यात आला असून, लस न घेतलेले व्यावसायिक अथवा कर्मचारी तपासणीदरम्यान आढळून आल्यास त्यांच्याविरुध्द कडक कायदेशीर करण्यात येईल, याची नोंद घेण्याचे आवाहन राहाता तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रमोद म्हस्के व शिर्डी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी केले आहे.